‘हर घर तिरंगा’सोबत ‘हर मनात दुर्गाताई जोशी’चा संदेश द्या- निलेश देव
अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.)। देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा अभिमान जागविला जात असताना, अकोल्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एका धाडसी वीरांगनेच्या शौर्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात १
Photo


अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.)। देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा अभिमान जागविला जात असताना, अकोल्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एका धाडसी वीरांगनेच्या शौर्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात १९२७ साली अकोला म्युनिसिपल कमिटीच्या इमारतीवर तिरंगा फडकाविणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक दुर्गाताई जोशी यांच्या स्मृतीला कायमस्वरूपी सन्मान मिळावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी केली आहे.

आज देशभरातील घरांवर तिरंगा अभिमानाने फडकत आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वज फडकाविणे म्हणजे ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देण्याचे धाडस होते. अकोला शहराने १९२७ मध्ये अशाच धाडसी घटनेचा साक्षीदार होण्याचा मान मिळविला. म्युनिसिपल कमिटीच्या सभासद असलेल्या दुर्गाताई जोशी यांनी ब्रिटिश राजवटीची पर्वा न करता म्युनिसिपल कमिटीच्या इमारतीवर तिरंगा फडकाविला होता.

दुर्गाताईंचे जीवन सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. प्लेगच्या साथीमध्ये भावाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या लहान मुलीच्या सांभाळासाठी नानासाहेब दाते त्यांना अकोल्यात घेऊन आले. जुन्या शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात त्यांचे वास्तव्य होते.

वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी तेल्हारा तालुक्यातील आडगाव येथील संपन्न जोशी कुटुंबात त्यांचा विवाह झाला. मात्र, अवघ्या दीड वर्षात कॉलऱ्याने पतीचे निधन झाले आणि दुर्गाताईंवर ऐन तारुण्यात वैधव्य आले. त्या काळातील विधवांवरील सामाजिक अन्याय, रूढी आणि बंधने त्यांनी नशिबाचा भाग म्हणून स्वीकारली नाहीत. अन्यायापुढे झुकायचे नाही, असा निर्धार करून त्यांनी सासरचा निरोप घेत अकोल्यात परतण्याचा निर्णय घेतला.

अण्णासाहेब कर्वे यांच्या हिंगणे येथील शाळेत शिक्षण घेतल्यानंतर दुर्गाताईंनी समाजातील अनिष्ट प्रथा आणि रूढींविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. देशाभिमानाने प्रेरित महिलांना एकत्र करून त्यांनी महिला मंडळाची स्थापना केली. देशसेवा, समाजसेवा आणि सामाजिक सुधारणांच्या कार्यामुळे अकोल्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वर्तुळात त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि त्या ‘वऱ्हाडची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

१९२७ साली म्युनिसिपल कमिटीच्या सभासद झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे धाडसी पाऊल उचलले. अकोला म्युनिसिपल कमिटीच्या इमारतीवर त्यांनी तिरंगा फडकाविला. अकोल्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील ही घटना आजही महत्त्वपूर्ण मानली जाते.

त्यानंतर १९३०च्या सत्याग्रहात दुर्गाताईंना सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासाठी त्यांनी कारावासाची शिक्षाही भोगली.

दुर्गाताईंच्या हातातील तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नव्हता, तर तो त्याग, संघर्ष आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक होता. त्यामुळे त्यांच्या ऐतिहासिक योगदानाला कायमस्वरूपी सन्मान मिळणे गरजेचे असल्याचे निलेश देव यांनी म्हटले आहे.

अकोला महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला ‘स्वातंत्र्यसैनिक दुर्गाताई जोशी प्रशासकीय भवन’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अकोल्याच्या प्रशासकीय इमारतीवर तिरंगा फडकाविणाऱ्या या धाडसी महिलेच्या स्मृतीला कायमस्वरूपी स्थान देणे ही अकोला महानगरपालिकेची ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

“‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने अकोल्याने ‘हर मनात दुर्गाताई जोशी’ हा संदेश द्यावा,” अशी अपेक्षाही निलेश देव यांनी व्यक्त केली.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande