
रुग्णाच्या वाहनावरून वाद; वाहनाची तोडफोड केल्याचाही दावा
अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील रहिवासी देवलाल वाघमारे यांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांवर शिवीगाळ व धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. वाहन रुग्णालयाच्या आवारात उभे केल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
वाघमारे यांच्या माहितीनुसार, ते उपचारासाठी अकोला मेडिकल कॉलेजमध्ये आले होते. त्यांच्यावर यापूर्वी चार शस्त्रक्रिया झाल्या असून, त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना वाहनातून खाली उतरवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने रुग्णालयाच्या बाजूला गाडी उभी केली होती.
दरम्यान, औषधे आणण्यासाठी वाघमारे यांचा मुलगा बाहेरील मेडिकलमध्ये गेला होता. औषधे मिळण्यास काहीसा विलंब झाल्याने तो परत येण्यास वेळ लागला. याच दरम्यान रुग्णालयाच्या आवारात वाहन उभे असल्याच्या कारणावरून डॉक्टरांनी वाद घातल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.
गाडी तातडीने हटविण्यास सांगताना डॉक्टरांनी आपल्याला शिवीगाळ केली, असा दावा वाघमारे यांनी केला. आपण यापूर्वी चार शस्त्रक्रिया झालेला रुग्ण असून मुलगा परत आल्यानंतर गाडी बाजूला करेल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी आपले म्हणणे ऐकून न घेता शिवीगाळ केली आणि हातात दगड घेऊन मारण्यासाठी धावून आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
याशिवाय, संबंधित डॉक्टरांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचाही दावा वाघमारे यांनी केला आहे.
या घटनेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील डॉक्टरांची बाजू तसेच रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे