अकोला जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जलसाठ्याची चिंता वाढली
काटेपूर्णा धरणात २५.१४ टक्के, तर उमा प्रकल्पात अवघा ५.५० टक्के पाणीसाठा अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. अकोला पाटबंधारे विभागाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता जा
अकोला जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जलसाठ्याची चिंता वाढली


काटेपूर्णा धरणात २५.१४ टक्के, तर उमा प्रकल्पात अवघा ५.५० टक्के पाणीसाठा

अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. अकोला पाटबंधारे विभागाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता जारी केलेल्या जलसाठा अहवालानुसार, अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २५.१४ टक्के, तर मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात अवघा ५.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

काटेपूर्णा प्रकल्पाची जलपातळी ३४१.५८ मीटर असून, त्यात २१.७०९ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच २५.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने काटेपूर्णा धरणातील घटता साठा चिंतेचा विषय ठरत आहे.

तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पात तुलनेने समाधानकारक पाणीसाठा असून, जलपातळी ४०८.०५ मीटर आहे. येथे ६४.३९ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ७८.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वान प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५३३ मिमी पाऊस झाला आहे.

पातूर तालुक्यातील मोर्णा प्रकल्पात जलपातळी ३६४.४० मीटर असून, २६.३४ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ६३.५४ टक्के पाणीसाठा आहे. या भागात आतापर्यंत ४७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याच तालुक्यातील निर्गुणा प्रकल्पात जलपातळी ३८७.३० मीटर असून, १४.४३ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ५०.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पाची स्थिती मात्र अत्यंत बिकट झाली आहे. या प्रकल्पाची जलपातळी ३३७.९० मीटर असून, केवळ ०.६४३ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच अवघा ५.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत फक्त ९० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे उमा प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती विशेष चिंताजनक बनली आहे.

दगडपारवा प्रकल्पात जलपातळी ३१५.७० मीटर असून, ५.०३ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ४९.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या क्षेत्रात आतापर्यंत २६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रकल्पांचे दरवाजे सध्या पूर्णपणे बंद असून, पाण्याचा विसर्ग शून्य क्युमेक्स आहे. विशेष म्हणजे, आज सर्वच प्रकल्पांच्या क्षेत्रात पावसाची शून्य नोंद झाली आहे.

पावसाने आणखी काही काळ पाठ फिरवल्यास धरणांमधील उपलब्ध साठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. विशेषतः काटेपूर्णा आणि उमा प्रकल्पातील घटता जलसाठा लक्षात घेता, आगामी काळात अकोला जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande