
पैसे भरूनही सोलर पंप मिळेना ३५ दिवसांपासून शेतकरी त्रस्त
अकोला, 11 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळावे आणि त्यांची विजेच्या समस्येतून सुटका व्हावी, यासाठी सरकारकडून मागेल त्याला सोलर पंप सारख्या विविध योजनांच्या मोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष धरावर महावितरणच्या अकार्यक्षम आणि भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे. स्वतःच्या खर्चाने साहित्य आणूनही ३५ दिवस प्रतीक्षाः मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील काजळेश्वर येथील एका शेतकऱ्याने शेतात सोलर पंप बसवण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रीतसर अर्ज करून ३०,६९४ रुपयांची रक्कम महावितरणकडे जमा केली होती. त्यानंतर महावितरणकडून ८ जुलै २०२६ रोजी संबंधित रोटोमॅक कंपनीचे सोलर पंपाचे साहित्य पाठवण्यात आले. हे साहित्य शेतकऱ्याच्या शेतात नेऊन तेथे सोलर पंप बसवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदार यंत्रणेची असते. परंतु, गाडी शेतात जात नाही असे अजब कारण
सांगून कंत्राटदाराने हात वर केले. अखेर पिकांच्या काळजीपोटी शेतकऱ्याने स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून भाड्याने ट्रॅक्टर केला आणि सर्व साहित्य शेतात पोहोचवले. मात्र, साहित्य शेतात आणून तब्बल ३५ दिवस उलटून गेले तरीही महावितरण किंवा संबंधित कंपनीच्या तंत्रज्ञांनी तेथे जाऊन सोलर पंप बसवून दिलेला नाही. त्यामुळे आधीच ट्रॅक्टरच्या भाड्याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागलेला शेतकरी आता या सोलर पंपाच्या प्रतीक्षेत पूर्णपणे हैराण झाला आहे. अधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे आश्वासन ठरले हवेतचः या मनस्तापामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने २३ जुलै रोजी अकोला येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपबिती मांडली व लेखी तक्रार दाखल केली. त्यावेळी महावितरणच्या
अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करून देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्ष जागेवर कोणतेही काम सुरू झालेले नाही. पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यातः सध्या गेल्या ८ ते १० दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतातील विहिरीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही, केवळ महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सोलर पंप चालू न झाल्याने पिकांना पाणी देता येत नाहीये. वेळेवर पाणी न मिळाल्यास हाताशी आलेले पीक सुकून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. महावितरणने कोणतीही नवीन कारणे न सांगता तातडीने सोलर पंप फीट करून द्यावा, अशी तीव्र मागणी आता केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे