
मुलांच्या वसतिगृहात १००, तर मुलींच्या वसतिगृहात ८० विद्यार्थ्यांना प्रवेश
अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.)। इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने अकोला शहरात मुलांचे आणि मुलींचे असे दोन शासकीय वसतिगृह सुरू असून, चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तापडियानगरातील बिर्ला रस्त्यावर मुलांचे शासकीय वसतिगृह असून, त्याची प्रवेश क्षमता १०० विद्यार्थ्यांची आहे. तर माधवनगरातील संत तुकाराम चौकाजवळ मुलींचे शासकीय वसतिगृह असून, येथे ८० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे.
चालू शैक्षणिक सत्रात व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाचा वापर करावा.
प्रवेशाचे वेळापत्रक
इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जांची छाननी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येईल. त्यानंतर पहिली निवड यादी ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, या यादीतील विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल.
रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे