
जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी
अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.)। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची त्रयस्थ व निष्पक्ष यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या असताना सापाने सहा विद्यार्थिनींना दंश केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यातील दीपिका लाकडा, सुष्मिता मांडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही घटना केवळ दुर्दैवी अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवास व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाची कार्यक्षमता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे पातोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्यातील सर्व आश्रमशाळांचे सोशल ऑडिट करण्याची मागणी
एका आश्रमशाळेची चौकशी करून प्रश्न संपणार नसून, राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे आणि छात्रालयांची व्यापक तपासणी करणे आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण अर्थात सोशल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण १५ दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणात इमारतींची सुरक्षितता, वीज व्यवस्था, स्वच्छता, साप-विंचू व इतर विषारी प्राण्यांपासून संरक्षण, विद्यार्थ्यांची निवास क्षमता, खाटा व झोपण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आहार व पोषण, वैद्यकीय सुविधा, औषधसाठा, आपत्कालीन उपचार व्यवस्था, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपलब्धता, शैक्षणिक सुविधा तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा प्रत्यक्ष वापर यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आहे.
सर्वेक्षण केवळ कागदोपत्री न करता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून करण्यात यावे. यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचीही तपासणी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद आहे.
आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था उभारण्याची मागणी
ज्या आश्रमशाळा किंवा वसतिगृहांमध्ये गंभीर त्रुटी आढळतील, त्या तातडीने दूर करण्यात याव्यात. धोकादायक वसतिगृहांमध्ये आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्यायी निवास उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक आश्रमशाळेत सर्पदंश, आग, विद्युत अपघात आणि अन्य आपत्कालीन परिस्थितींसाठी २४ तास वैद्यकीय मदत व आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जपतलाई दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य आर्थिक मदत व पुनर्वसनाची व्यवस्था करावी, तसेच जखमी विद्यार्थिनींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही पातोडे यांनी केली आहे.
‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा
जपतलाई दुर्घटनेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. साप वसतिगृहात कसा शिरला, विद्यार्थिनी जमिनीवर का झोपत होत्या, सुरक्षा व्यवस्थेत कोणत्या त्रुटी राहिल्या, निधीचा वापर कसा झाला आणि यापूर्वीच्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली, याची संपूर्ण माहिती जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली.
“तीन विद्यार्थिनींचा जीव गेला आहे. हा केवळ अपघात म्हणून विषय संपवता येणार नाही. दोषींवर कारवाई झाली नाही आणि राज्यातील आश्रमशाळांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण झाले नाही, तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने ‘जवाब दो’ आंदोलन उभारेल,” असा इशारा पातोडे यांनी दिला.
दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या आश्रमशाळांमध्ये त्यांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची हमी शासनाने देणे आवश्यक आहे. सरकारने केवळ संवेदना व्यक्त न करता ठोस कृती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे