मोर्णा नदीवरील पुलाच्या उंचीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या
अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.)। बोरगाव वैराळे ते अंदुरा मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून या मागणीसाठी पाठपुरावा करूनही
Photo


अकोला, ११ ऑगस्ट (हिं.स.)। बोरगाव वैराळे ते अंदुरा मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून या मागणीसाठी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

समस्त गावकरी मंडळींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मोर्णा नदीवरील सदर पूल कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहते आणि बोरगाव वैराळे-अंदुरा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. परिणामी परिसरातील सुमारे २५ गावांचा संपर्क प्रभावित होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पुरामुळे संपर्क तुटल्याने शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे कामगार तसेच रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीतही नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत असून, याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप या प्रश्नावर ठोस निर्णय झालेला नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

पुलाच्या उंचीवाढीच्या कामाला तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande