नांदेड - स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा व तालुकास्तरावर राबविण्
नांदेड - स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा व तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरण (Renewal) अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.

महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून नूतनीकरणाचा अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर संकेतस्थळावर अर्जाची सद्यस्थिती तपासावी.

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन विहित मुदतीत परिपूर्ण अर्ज सादर करावा. १५ सप्टेंबरनंतर नूतनीकरणाचा अर्ज भरता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेल आयडीवर याबाबत संदेश पाठविण्यात आले आहेत.

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

सन २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करावेत.

अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात असताना स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या आणि आता पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली नव्हती. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ते वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांना वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी वसतिगृहास भेट देऊन प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.

विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या अधिकृत Instagram व Facebook पेज ‘samajkalyannanded’ ला फॉलो करून वेळोवेळी देण्यात येणारी अधिकृत माहिती पाहावी. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने अधिकृत WhatsApp ग्रुप तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.

इतर कोणत्याही अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीशी संपर्क न साधता अडचणी असल्यास थेट समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून समस्येचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande