
मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य शासनाच्य़ा कृषि विभागाच्या अखत्यारितील कृषी आय़ुक्तालयात एक संचालक, दोन सह संचालक आणि एक अपर संचालक अशा चार पदांच्या निर्मितीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
केंद्र सरकारने राज्यात कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठीही ॲग्रीस्टॅक संचालनालय स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कृ़षी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन व ॲग्रीस्टॅक संचालनालय स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी कृषी संचालक, अपर संचालक, सहसंचालक (सांख्यिकी) आणि सहसंचालक(माहिती-तंत्रज्ञान) अशी चार पदे निर्माण करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे.
या नवीन पदांची वेतनश्रेणी एस-२५ पेक्षा अधिक असल्याने त्याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानुसार चार पदांना मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर