
गुवाहाटी, 11 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममध्ये अद्यापही पुरामुळे 10 जिल्ह्यांतील 1 लाख 26 हजार 431 लोकसंख्या प्रभावित आहे. याचदरम्यान आणखी एक मृतदेह सापडला आहे. पुरात सर्वस्व गमावलेले लोक आपली घरे पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. मालमत्ता आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू झाले आहे. गैरसरकारी संस्था आणि सामान्य नागरिक प्रभावित भागात आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत आहेत. जे लोक आर्थिक मदत करू शकत नाहीत, ते श्रमदानाच्या माध्यमातून या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपले योगदान देत आहेत. अप्पर आसाममधील शिवसागर, चराईदेव, जोरहाट जिल्ह्यांमध्ये लोकांचे सामान्य जीवन अद्यापही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 10 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार धनसिरी नदी (नुमलीगड आणि गोलाघाट) तसेच कुशियारा नदी (श्रीभूमी) भागात अद्यापही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. दरम्यान, सोमवारी शिवसागर जिल्ह्यात आणखी एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे पुरामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या 102 वर पोहोचली आहे. सध्या एकूण 10 जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती कायम आहे. प्रभावित जिल्ह्यांमध्ये नागांव, गोलाघाट, शिवसागर, होजाई, दरंग, कार्बी आंगलोंग, लखीमपूर, कछार, चराईदेव आणि जोरहाट यांचा समावेश आहे. पुरामुळे 10 जिल्ह्यांतील 25 महसूल मंडळांमधील एकूण 458 गावे प्रभावित झाली आहेत. सध्या राज्यातील एकूण 126431 लोकसंख्या अद्याप प्रभावित आहे आणि 11287.04 हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली गेली आहे.
पुरातील मदत आणि बचाव अभियानात एसडीआरएफ, लष्कर/निमलष्करी दल, एनडीआरएफ, डीडीआरएफ, हवाई दल, पोलीस, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (एफ अँड ईएस), मंडळ कार्यालय/स्थानिक प्रशासन, नागरी संरक्षण/प्रशिक्षित स्वयंसेवक आणि अग्निशमन विभाग कार्यरत आहेत. दरम्यान, पूरग्रस्त भागांमध्ये शनिवारी राज्य सरकारने एकूण 58 वैद्यकीय पथके तैनात केली. यावेळी 4 बोटीही मदतकार्यात कार्यरत होत्या. यादरम्यान बोटींच्या माध्यमातून पूरग्रस्त 40 लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.
पूरग्रस्तांमध्ये राज्य सरकारच्या वतीने तांदूळ (क्विंटलमध्ये): 260.364, डाळ (क्विंटलमध्ये): 46.548, मीठ (क्विंटलमध्ये): 13.9728, मस्टर्ड ऑईल/मोहरीचे तेल (लिटरमध्ये): 725.27 तसेच जनावरांसाठी चारा- गव्हाचा कोंडा (क्विंटलमध्ये): 1396.07 इतकी मदत सामग्री वितरित करण्यात आली. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule