
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। वाढती गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्थेतील प्रलंबित खटल्यांचा थेट फटका बीडमधील तुरुंग प्रशासनाला बसला आहे. बीड जिल्हा कारागृहात केवळ १६१ कैद्यांची क्षमता असताना, सद्यस्थितीत तब्बल ३६० कैद्यांना दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी वाढल्याने त्यांच्या निवासाचा, आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी कारागृह प्रशासनाने नुकतेच ६० कैद्यांना लातूर येथील कारागृहात हलवले आहे.
बीड जिल्हा कारागृहाची मूळ क्षमता १४४ पुरुष आणि १७ महिला अशी एकूण १६१ कैद्यांची आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत गुन्हेगारीचे आणि पर्यायाने बंदींची संख्या झपाट्याने वाढूनही कारागृहाची क्षमता एक टक्क्यानेही वाढवण्यात आलेली नाही. सध्या कारागृहातील बहुतांश कैदी हे खून, बलात्कार, पोक्सो आणि हाणामारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आहेत. यातील सर्वाधिक संख्या ही 'अंडरट्रायल' म्हणजेच न्यायाधीन कैद्यांची आहे. ज्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे, पण अद्याप निकाल आलेला नाही व जामीनही मिळालेला नाही अशा कच्च्या कैद्यांमुळे कारागृहातील गर्दी फुगली आहे. खटले रेंगाळत असल्याने कैद्यांना वेळेवर जामीन मिळत नाही आणि कारागृहात जागा अपुरी पडत आहे.
कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा पुरवताना कारागृह प्रशासनाची मोठी कसरत होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण अधिकच वाढला आहे. मूळ क्षमतेनुसार कारागृहात केवळ ५० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत, मात्र वाढलेल्या कैद्यांच्या संख्येनुसार सुरक्षेसाठी किमान १२५ कर्मचाऱ्यांची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर बीड कारागृहाचे अधीक्षक राजाराम चांदणे यांनी भाष्य केले आहे. क्षमतेपेक्षा जास्त बंदी असल्याचे मान्य करत ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ६० बंदी लातूरला पाठवूनही सध्या ३५० हून अधिक बंदी येथे आहेत. प्रशासनावर ताण येत असला तरी सुरक्षा आणि इतर सेवा, सुविधा तत्परतेने पुरवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis