
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)मौजे चिंचोळीकाटी, ता. मोहोळ येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील ४८ घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी आमदार राजाभाऊ खरे यांनी ठाम पाठपुरावा सुरू केला आहे. गट क्रमांक १४४/१ मधील २,२३०.०८ चौरस मीटर क्षेत्र घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शासनाच्या मंजूर लेआउट प्लॅन आणि मोजणी नकाशानुसार ग्रामपंचायतीमार्फत संबंधित लाभार्थ्यांना जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला आहे. यातील अनेक लाभार्थ्यांनी आपल्या हक्काच्या घरांच्या बांधकामालाही सुरुवात केली आहे.मात्र, भविष्यात लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, तसेच मंजूर रेखांकनामध्ये कोणताही बदल होऊ नये आणि लाभार्थ्यांना देण्यात आलेला जमिनीचा ताबा कायम राहावा, यासाठी आमदार राजाभाऊ खरे यांनी मोहोळचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या विषयावर आमदार खरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन चर्चा केली असून, घरकुल लाभार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.४८ कुटुंबांना हक्काचे घर मिळावे आणि त्यांना भविष्यात जमीन किंवा ताब्यासंदर्भात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मंजूर आराखडा व लाभार्थ्यांना देण्यात आलेला ताबा कायम ठेवणे आवश्यक असल्याचे आमदार खरे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड