
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन ज्योतिर्लिंग मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या वेळेनुसार दर्शन व्यवस्था सुरू राहणार आहे.
पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीक्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रा नियोजनाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिराच्या दर्शनाच्या वेळेसह वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर तसेच अभिषेक आणि व्हीआयपी दर्शन व्यवस्था याबाबत विविध निर्णय घेण्यात आले.श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यांतर्गत सध्या सभामंडप आणि पायरी मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी दर्शनासाठी वेळ मर्यादित असल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, सध्या दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू असल्याने श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून मंदिर दिवसभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.श्रावण महिन्यात विशेषतः श्रावणी सोमवारच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासह प्लास्टिकमुक्त परिसरासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु