
चोवीस कॅरेट सोनं १.५५ लाखांवर; चांदी २.५५ लाख रुपये किलो
जळगाव, ११ ऑगस्ट (हिं.स.) : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची बातमी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असतानाच, आज सकाळी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सणासुदीचे दिवस जवळ येत असताना झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
आज सकाळच्या बाजारातील दरानुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३,१६० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५५ हजार २८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
त्याचबरोबर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २,९०० रुपयांची वाढ झाली असून, त्याचा दर १ लाख ४२ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर २,३७० रुपयांनी वाढून १ लाख १६ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
चांदीच्या दरातही मोठी वाढ
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही आज मोठी तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीचा भाव २ लाख ५५ हजार रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
चांदीच्या दरातील या मोठ्या वाढीचा परिणाम दागिने, चांदीच्या वस्तू तसेच चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या वाढलेल्या दरांमुळे खरेदीचे बजेट वाढण्याची शक्यता असून, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
दरम्यान, मौल्यवान धातूंच्या दरातील ही तेजी आगामी काळात कायम राहणार की पुन्हा दरांमध्ये चढ-उतार होणार, याकडे ग्राहक आणि सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर