
परभणी, 11 ऑगस्ट (हिं.स.) नागरिकांना पोलीस विभागाशी संपर्क साधने अधिक सुलभ व्हावे तक्रारी व अडचणीसाठी थेट संपर्क करता यावा तसेच पोलिसांतील विविध कार्यालय व शाखांनी नागरिकांशी सातत्याने संपर्क करावा या उद्देशाने पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्हा पोलीस विभागातील पोलीस अधीक्षक ते ठाणेप्रभारी या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांना स्वतंत्र मोबाईल नंबर दिला आहे.
त्यामध्ये सायबर सेल, भरोसा सेल, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, अर्ज शाखा, ११२ सेवा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे आदींचा समावेश आहे. हा कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक ऑन ड्युटी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना संपर्क साधल्यास कार्यालयीन वेळेपूरते मर्यादित न राहता संबंधित पोलीस कार्यालयाशी थेट संपर्क साधता येईल.
पोलीस अधीक्षकांच्या या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिस व नागरिकांतील संवाद अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून पोलीस प्रशासनाशी अधिक प्रभावी संपर्क करण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis