जखमी गोवंशाच्या उपचारासाठी ‘गौ संजीवनी’ ॲम्ब्युलन्स
‘वसा’ संस्थेला अत्याधुनिक हायड्रॉलिक कॅटल ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील रस्त्यांवर अपघातात जखमी होणाऱ्या तसेच आजारी अवस्थेत बेवारस भटकणाऱ्या गोवंशासह इतर मोठ्या प्राण्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी मालू परिवारान
जखमी गोवंशाच्या सेवेत ‘गौ संजीवनी’ ॲम्ब्युलन्स


‘वसा’ संस्थेला अत्याधुनिक हायड्रॉलिक कॅटल ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण

अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील रस्त्यांवर अपघातात जखमी होणाऱ्या तसेच आजारी अवस्थेत बेवारस भटकणाऱ्या गोवंशासह इतर मोठ्या प्राण्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी मालू परिवाराने ‘वसा’ संस्थेला अत्याधुनिक हायड्रॉलिक कॅटल ऍम्ब्युलन्स दान केली आहे. ‘गौ संजीवनी’ असे नामकरण करण्यात आलेल्या या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण गोवर्धन पर्वत येथील श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटल व वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्व. प्रवीण मालू आणि स्व. प्रणम मालू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालू एंटरप्रायझेसतर्फे ही ऍम्ब्युलन्स ‘वसा’ संस्थेला देण्यात आली. संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र गो-सेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, वर्षा मालू, अलका मालू, वसा संस्थेचे सचिव गणेश अकर्ते, कोषाध्यक्ष भूषण सायंके आणि अध्यक्ष शुभमनाथ सायंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात वर्षा मालू यांनी स्व. प्रवीण आणि स्व. प्रणम मालू यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘वसा’ संस्थेच्या प्राणीसेवेचे कौतुक केले. त्यानंतर अलका मालू आणि वर्षा मालू यांच्या हस्ते ऍम्ब्युलन्सचे पूजन करून तिची चावी ‘वसा’ संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.

प्राणीसेवेला मिळणार अधिक बळ

महाराष्ट्र गो-सेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी जखमी व आजारी जनावरांसाठी अशा अत्याधुनिक ऍम्ब्युलन्सची गरज अधोरेखित केली. प्राणीसेवेचे कार्य अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रास्ताविकात ‘वसा’ संस्थेचे सचिव गणेश अकर्ते यांनी संस्थेच्या १५ वर्षांच्या सेवाकार्याचा आढावा घेतला. संस्थापक अध्यक्ष शुभमनाथ सायंके यांनी उद्योजक वरुण मालू, पुष्पा मालू, मालू परिवार तसेच संस्थेच्या नियमित देणगीदारांचे आभार मानत संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुमित वैद्य यांनी केले, तर आभार संपदा गडलिंग यांनी मानले.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande