
परभणी, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परभणी शहरात मंगळवारी (दि. ११) तिरंगा सायकल-बाईक रॅली उत्साहात पार पडली. देशभक्तीचा संदेश देत शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः सहभागी होत वाहन चालविले. जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीपूर्वी ‘वंदे मातरम्’चे समूहगायन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. हातात तिरंगा आणि मनात देशभक्तीचा उत्साह घेऊन सहभागी झालेल्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सायकल व दुचाकींवर तिरंगा फडकावत युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी देशभक्तीचा जागर केला.
रॅलीमुळे शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते. रॅलीत निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, युवक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा संकुलातून सुरू झालेल्या या रॅलीचा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप झाला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, हा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis