लातूरचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’प्रदान
लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथील ११ वर्षीय अल्पवयीन बालकावरील लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणाचा अत्यंत कौशल्यपूर्ण, शास्त्रीय आणि प्रभावी तपास करून आरोपीला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूम
विवेकानंद पाटील


लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथील ११ वर्षीय अल्पवयीन बालकावरील लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणाचा अत्यंत कौशल्यपूर्ण, शास्त्रीय आणि प्रभावी तपास करून आरोपीला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सध्या लातूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट अन्वेषण कार्याबद्दल सन २०२४ चे ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण)’ प्रदान करण्यात आले.

पुणे येथे आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय तपास कार्याची केंद्र शासनाच्या स्तरावर दखल घेतली गेल्याने लातूर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी उपलब्ध परिस्थितीजन्य, तांत्रिक आणि शास्त्रीय पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून तपासाची दिशा निश्चित केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शास्त्रीय पुराव्यांचे संकलन आणि घटनाक्रमाशी त्यांची सांगड घालण्यावर विशेष भर देण्यात आला. संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध तपास पद्धतींचा प्रभावी वापर करण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक व शास्त्रीय पुराव्यांची योग्य पद्धतीने सांगड घालून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा साखळी तयार करण्यात आली. तपासातील प्रत्येक बाब कायदेशीर चौकटीत राहून पूर्ण करण्यात आली.आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केल्यानंतर तपास पूर्ण करून वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तपासातून समोर आलेले पुरावे प्रभावीपणे मांडले गेले. परिणामी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या संपूर्ण तपास प्रक्रियेत पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी दाखविलेले तपासातील कौशल्य, तांत्रिक ज्ञान, बारकाईने केलेले पुरावे संकलन आणि कायदेशीर बाबींची अचूक जाण यामुळे या प्रकरणाच्या निकालात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.

गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा तपास अत्यंत प्रभावीपणे पूर्ण करून आरोपीला न्यायालयीन शिक्षेपर्यंत पोहोचविणाऱ्या उत्कृष्ट अन्वेषणाची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) या मानाच्या पुरस्कारासाठी पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार केवळ एका अधिकाऱ्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव नसून, गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पुरावे आणि कायदेशीर कौशल्य यांचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचीही दखल मानली जात आहे.

लातूर पोलीस दलाकडून अभिनंदन

पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या पुरस्कारामुळे लातूर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या उत्कृष्ट तपास कार्याला निश्चितच प्रोत्साहन मिळाले असून, गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक शास्त्रीय, तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित पद्धतीने करण्यासाठी हा गौरव प्रेरणादायी ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande