पुणे - एआय आधारित पडताळणी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्यास अर्ज नामंजूर
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)फेसलेस लर्निंग लायसन्स प्रक्रियेत आधार कार्डावरील छायाचित्राच्या आधारे चेहऱ्याची ओळख कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीद्वारे तपासली जाते. त्यामुळे लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा देताना अर्जदाराचा चेहरा स्पष्ट दिसणे,
पुणे - एआय आधारित पडताळणी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्यास अर्ज नामंजूर


पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)फेसलेस लर्निंग लायसन्स प्रक्रियेत आधार कार्डावरील छायाचित्राच्या आधारे चेहऱ्याची ओळख कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणालीद्वारे तपासली जाते. त्यामुळे लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा देताना अर्जदाराचा चेहरा स्पष्ट दिसणे, पुरेसा प्रकाश असणे आणि कोणताही व्यत्यय नसणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू असताना इतर व्यक्तींची उपस्थिती, अनावश्यक हालचाल किंवा आवाज टाळावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

सारथी प्रणालीद्वारे आधार-आधारित फेसलेस पद्धतीने लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची एआय प्रणालीच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. या प्रक्रियेदरम्यान अर्जदाराचा चेहरा आधार कार्डावरील छायाचित्राशी जुळणे आवश्यक आहे. तसेच डोळ्यांची उघडझाप (Blink Detection) योग्यरीत्या होणे, अर्जदाराच्या आजूबाजूला अन्य कोणतीही व्यक्ती नसणे, आवाज किंवा अनावश्यक हालचाल नसणे आणि परीक्षेदरम्यान अन्य व्यक्तीकडून कोणतीही मदत घेतली जात नसल्याची खात्री होणे आवश्यक आहे.

या नियमांचे पालन न झाल्यामुळे अनेक अर्ज एआय आधारित पडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरत असून लर्निंग लायसन्स मंजूर होत नसल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त होत आहेत. परिणामी काही नागरिकांनी भरलेले शुल्क वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे.फेसलेस लर्निंग लायसन्स अर्जांची पडताळणी आणि त्यावरील निर्णय प्रक्रिया पूर्णपणे केंद्रीय एआय आधारित प्रणालीद्वारे केली जाते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या स्तरावर कोणताही हस्तक्षेप करून अर्ज मंजूर करणे अथवा निर्णय बदलणे शक्य नाही, असे परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन परीक्षा देताना शांत वातावरण, पुरेसा प्रकाश, स्पष्ट चेहरा आणि स्थिर स्थिती सुनिश्चित करावी. तसेच परीक्षेदरम्यान कोणत्याही व्यक्तीची मदत घेऊ नये आणि प्रणालीकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande