
लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। ऑगस्ट महिना निम्म्यावर आला असतानाही शिरूर अनंतपाळ तालुक्यात अपेक्षित दमदार पाऊस झालेला नसल्याने प्रकल्प, नदी-नाले अद्याप तहानलेलेच आहेत. पावसाने पुन्हा एकदा लांबणीवर दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून खरीप पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. सुरुवातीस झालेल्या पावसामुळे पिकांना उभारी मिळाली मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने अनेक भागातील पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची वाढ पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. ऑगस्ट महिन्याचा मध्यजवळ येऊनही नदी-नाले, ओढे तसेच लहान-मोठे प्रकल्प अपेक्षेप्रमाणे भरलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस
झाला नाही तर खरीप पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis