
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.) अंबासाखर कारखाना ते लोखंडी सावरगाव या मुख्य मार्गावरील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गावर वारंवार दुरुस्तीची कामे करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा सिमेंटचा रस्ता अल्पावधीतच उखडल्याने त्यावर सतत मलमपट्टी करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर तसेच प्रशासनाच्या कारभारावर प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सिमेंटचा हा मार्ग लोखंडी सावरगावमार्गे बीडकडे तसेच कळम आणि पुणे या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, अंबा साखर कारखाना ते लोखंडी सावरगावदरम्यानच्या रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असून, सातत्याने दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सिमेंटच्या रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले असून, काँक्रीट उखडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या रस्त्याच्या एका बाजूला दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. मार्गावर ‘पुढे रस्त्याचे काम सुरू आहे, वाहने सावकाश चालवा’ असे फलक आणि बॅरिकेड्स लावण्यात आले असून, एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
केवळ वरवरची मलमपट्टी किंवा खड्डे बुजविण्याऐवजी या रस्त्याच्या निकृष्ट कामास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी व दर्जेदार तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी लोखंडी सावरगाव तसेच परिसरातील नागरिक आणि या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून केली जात आहे.
अपघाताची भीती आणि वेळेचा अपव्यय
वारंवार सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असून, वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी धुळीमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिमेंटचा रस्ता दीर्घकाळ टिकणारा असतो, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, या रस्त्याची वारंवार होणारी दुरवस्था आणि दुरुस्ती पाहता ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis