
बीड, ११ ऑगस्ट (हिं.स.)। परळी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज, ११ ऑगस्ट रोजी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिरेवाडी येथील प्रस्तावित कृषी महाविद्यालयाच्या जागेचीही पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली.
परळी वैद्यनाथ शहराच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील टेकडीवरील मैदानावर होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी व्यासपीठ, बैठक व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था तसेच मान्यवरांच्या ये-जा व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कार्यक्रम सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विविध विभागांमध्ये समन्वय साधून सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आश्विनी जिरंगे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता स्वामी, तहसीलदार रनवरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर, गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले, संतोष रोडे, ढवळे, मनोज गित्ते, तलाठी संदीप कराड तसेच पशुवैद्यकीय विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.
परळी येथे तब्बल ५६५ कोटी रुपये खर्चून नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ४१ हेक्टर ८० आर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयासोबत पशुधन प्रक्षेत्रही उभारण्यात येणार असून, त्यामुळे पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.
या महाविद्यालयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासोबतच शेतकरी आणि पशुपालकांना आधुनिक पशुवैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प परळीच्या शैक्षणिक तसेच आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
जिरेवाडीतील कृषी महाविद्यालयाच्या जागेचीही पाहणी
दरम्यान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिरेवाडी येथील प्रस्तावित कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी प्रस्तावित प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली तसेच प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेतला.
प्रस्तावित कृषी महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पशुवैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून परळी परिसरातील शैक्षणिक, कृषी आणि संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१५ ऑगस्टच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून विविध विभागांमध्ये समन्वय साधत तयारीला वेग देण्यात आला आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis