परभणी - हरंगुळ येथील राजा भर्तृहरीनाथ यात्रेसाठी आरोग्य विभाग सज्ज
परभणी, 11 ऑगस्ट, (हिं.स.) गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र हरंगुळ येथे 15 ते 19 ऑगस्टदरम्यान आयोजित राजा भर्तृहरीनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. यात्रेदरम्यान मोठ्या सं
हरंगुळ येथील राजा भर्तृहरीनाथ यात्रेसाठी आरोग्य विभाग सज्ज : पथकाद्वारे पाहणी; स्वच्छता, पाणी निर्जंतुकीकरणासह आपत्कालीन आरोग्य सुविधांचे नियोजन


परभणी, 11 ऑगस्ट, (हिं.स.) गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र हरंगुळ येथे 15 ते 19 ऑगस्टदरम्यान आयोजित राजा भर्तृहरीनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोजकुमार दीक्षित, जिल्हा पर्यवेक्षक सुदर्शन आठवले आणि तालुका आरोग्य सहाय्यक कळसाईतकर यांनी हरंगुळ येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भोसले, डॉ. तिडके तसेच आरोग्य सहाय्यक रंगनाथ आव्हाड उपस्थित होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गाव व यात्रा परिसरात घरोघरी जाऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरातील स्वच्छतेची कटाक्षाने काळजी घेण्याबरोबरच दूषित पाण्याचे साठे तपासून ते रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले. गावातील सर्व पाणीस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. यात्रा परिसरात आवश्यकतेनुसार धूरफवारणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून, यात्रेदरम्यान कोणतीही आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी आपत्कालीन आरोग्य पथक सज्ज ठेवण्यात येणार आहे. तसेच रुग्णवाहिका सुविधेबाबतही नियोजन करण्यात आले आहे. राजा भर्तृहरीनाथ यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असून, त्यामध्ये लहान बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असतो. त्यामुळे भाविकांना आरोग्य पथकाच्या माध्यमातून आवश्यक औषधोपचार, आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोद्रीच्या वैद्यकीय अधिकार्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या. यात्रेच्या कालावधीत आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असून, आरोग्य विभागाकडून करण्यात येणार्या उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यानुसार पुढील नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यात्रेकरूंना सुरक्षित व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande