सोलापूर : होटगी रोड कामातील त्रुटींवरील कारवाईला विलंब
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। होटगी रोडवरील रस्ते कामात गंभीर तांत्रिक त्रुटी आढळूनही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कामामुळे ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला बाधा
smc


सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। होटगी रोडवरील रस्ते कामात गंभीर तांत्रिक त्रुटी आढळूनही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कामामुळे ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला बाधा येण्याची शक्यता असून, भविष्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, त्रुटी दूर केल्यानंतरच पुढील काम सुरू करावे, असा लेखी आदेश सोमवारीही काढण्यात आलेला नाही.

होटगी रोडच्या कामातील तांत्रिक त्रुटींची तपासणी करून त्यावर आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली याप्रकरणी बैठकही झाली. मात्र, या बैठकीचा इतिवृत्तांत अद्याप आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला नसल्याने पुढील निर्णय रखडल्याची माहिती आहे. दरम्यान, नगर अभियंता कार्यालयाने होटगी रोडच्या कामाची तातडीने पाहणी करून अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीतही तांत्रिक त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांकडून एकमेकांकडे बोट दाखविण्यात आल्याची चर्चा होती.

महापालिका प्रशासनाकडून संबंधित एमएसआयडीसीला तोंडी सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, लेखी आदेश नसल्याने रस्त्याचे काम सुरूच आहे. आयुक्तांकडून लवकरच लेखी आदेश काढण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सोमवार उलटूनही आदेश निघाला नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचे प्रशासनाला किती गांभीर्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. होटगी रोडच्या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना बैठकीचा इतिवृत्तांतच आयुक्तांकडे सादर झालेला नसल्याने प्रशासकीय पातळीवरील समन्वयाचा अभाव पुन्हा समोर आला आहे. लेखी आदेशाअभावी काम सुरू राहिल्यास भविष्यात ड्रेनेज आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande