अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग ; चीनी कुरापतींना सडेतोड प्रत्युत्तर
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट (हिं.स.) : अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग आहे, अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केली. अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या पार्श्वभू
रणधीर जयस्वाल, परराष्ट्र प्रवक्ते


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट (हिं.स.) : अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग आहे, अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केली. अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारताने ही भूमिका मांडली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग आहे. ही वस्तुस्थिती आधीपासूनच स्पष्ट आहे. या निर्विवाद सत्यात कोणताही बदल कोणीही घडवून आणू शकत नाही. भारत-चीन संबंधांबाबत जायसवाल यांनी सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्याला भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, सीमाविषयक मुद्द्यांवर चीनसोबतच्या चर्चेदरम्यान भारताने सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमावर्ती भागातील परिस्थितीचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापक द्विपक्षीय संबंधांवर होईल, यावरही भारताने भर दिला आहे. भारत-चीन सीमा विषयक नुकत्याच झालेल्या ‘वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्स्टेशन ऍन्ड कोऑर्डिनेशन’च्या (डब्ल्यूएमसीसी) 36 व्या बैठकीतही ही भूमिका पुन्हा अधोरेखित करण्यात आली. या बैठकीत दोन्ही देशांनी सविस्तर चर्चा करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थितीचा आढावा घेतला. द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य कायम राखणे आवश्यक असल्याचे भारताने यावेळी पुन्हा स्पष्ट केले.

अरुणाचलमधील 27 ठिकाणांची अधिकृत नावे अधोरेखित

चीनकडून अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांना वारंवार चिनी नावे देण्याचे प्रयत्न सुरू असताना, भारताने ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची त्यांच्या प्रमाणित नावांसह ओळख करून दिली आहे.सरकारच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमाचा उद्देश या ठिकाणांची अचूक ओळख अधोरेखित करणे तसेच त्यांचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या बीजिंगच्या प्रयत्नांना भारताने यापूर्वीही ठामपणे नाकारले आहे. अशा प्रकारचे नामकरणाचे प्रयत्न निरर्थक आणि हास्यास्पद असून, त्यातून अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या वस्तुस्थितीत कोणताही बदल होऊ शकत नाही, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे.

या 27 ठिकाणांमध्ये अनेक रणनीतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. त्यामध्ये लॉन्ग जू, जिथे 1959 मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात संघर्ष झाला होता, तसेच थाग ला, जिथे 1962 च्या भारत-चीन युद्धातील सुरुवातीच्या लढायांपैकी एक झाली होती, यांचा समावेश आहे.याशिवाय, पूर्व अरुणाचल प्रदेशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स केंद्र जयरामपूर, तसेच 1962 च्या युद्धातील भारतीय लष्करी वीरांच्या स्मृतींशी संबंधित जसवंत गढ आणि शेर-ए-थापा मेमोरियल यांचाही या यादीत समावेश आहे.---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande