अमेरिकेत रस्ते अपघातात २६ वर्षीय भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
अमरावती, 11 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेतील ओहायो राज्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात आंध्र प्रदेशातील २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. दिलीप कुमार बुंगातवुला हा आपल्या कारमधून जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप ट्रकने त्यांच्या कारला जोरदार
अमेरिकेत रस्ते अपघातात २६ वर्षीय भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू


अमरावती, 11 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेतील ओहायो राज्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात आंध्र प्रदेशातील २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. दिलीप कुमार बुंगातवुला हा आपल्या कारमधून जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ओहायोमधील मॅसेडोनिया परिसरातील इंटरस्टेट-४८० महामार्गावर झाला. दिलीप कुमार सेडान कारमधून प्रवास करत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप ट्रकने सेंटर डिव्हायडर ओलांडून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचेपर्यंत दिलीप कुमार यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यातील जेट्टीवारिपल्ली गावचे मूळ रहिवासी असलेला दिलीप कुमार उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने २०२५ मध्ये केंट स्टेट युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ सायन्स (MS) पदवी पूर्ण केली होती.

न्यूयॉर्कमधील भारतीय महावाणिज्य दूतावासाने दिलीप कुमार यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. तसेच भारतातील त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे सांगितले आहे. महावाणिज्य दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “७ ऑगस्ट २०२६ रोजी ओहायो येथे झालेल्या कार अपघातात भारतीय नागरिक दिलीप कुमार बुंगातवुला यांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी ऐकून आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे.” दूतावासाने पुढे म्हटले आहे की, “या कठीण काळात आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. महावाणिज्य दूतावास कुटुंबीयांच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.”

दरम्यान, नॉर्थ अमेरिका तेलुगू सोसायटीने दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी निधी संकलन मोहीम सुरू केली आहे. सोसायटीने म्हटले आहे की, भारतातील दिलीप कुमार यांचे आई-वडील आणि भाऊ यांच्यासाठी हा अचानक आलेला धक्का अत्यंत दुःखद आणि अकल्पनीय आहे. त्यांचे वडील श्रीहरी बुंगातवुला हे शेतकरी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण आहे.

दिलीप यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आई-वडिलांनी अनेक मोठे त्याग केले होते. मुलाने शिक्षण पूर्ण करून यशस्वी भविष्य घडवावे, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांनी नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीय त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी भारतात आणण्याची व्यवस्था करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande