
मुंबई, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून भांडवली खर्च व खेळत्या भांडवलासाठी कर्ज मिळावे यासाठीचा प्रस्ताव साखर आयुक्त, पुणे यांना सादर केला होता.
त्यानुसार या कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली. कारखान्याचा १८ कोटी ९ हजार रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. कारखान्याच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून व हे पूर्व उदाहरण म्हणून गृहीत धरले जाणार नाही आणि फक्त एकवेळचे उदाहरण म्हणून गृहीत धरण्यात येईल या अटीवर मान्यता देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर