
नाव किटी पार्टीचे; मात्र चर्चेचा विषय थेट महापौरांच्या खुर्चीपर्यंत!
नाशिक, 11 ऑगस्ट (हिं.स.)। पंचवटीत भाजपच्या एका नगरसेविकेच्या घरी झालेल्या बैठकीत महापालिकेतील कारभारावरून नाराजी व्यक्त करत ‘महापौर हटाव’चा मुद्दा उपस्थित झाल्याची चर्चा आहे. भाजपसह महायुतीतील घटक पक्षांच्या नगरसेविका बैठकीला उपस्थित असल्याचे सांगितले जात असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीला भाजपच्या नगरसेविकांसह महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेविकांचीही उपस्थिती होती. या बैठकीतील कथित चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या घडामोडीला अधिक चर्चेचे स्वरूप आले आहे.शहरातील रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांची प्रलंबित कामे यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. महापालिका प्रशासनावर महापौरांचा अपेक्षित अंकुश नसल्याचा आरोपही काही नगरसेविकांनी केल्याची माहिती आहे.
खड्ड्यांमुळे सहा नाशिककरांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवरही बैठकीत संताप व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.याशिवाय, सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असताना महापालिकेची अनेक विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले जाते. या सर्व प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.दरम्यान, या कथित बैठकीत सुमारे ४० नगरसेविका उपस्थित होत्या, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ अंतर्गत नाराजीचा सूर आहे की महापौरांविरोधात प्रत्यक्ष राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत, याबाबत नाशिकच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी मात्र ‘महापौर हटाव’च्या चर्चेपासून अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट केले.
महापौर म्हणाल्या की, गटा-तटाच्या राजकारणाची “ही वेळ नाही. याबाबत अधिकाऱ्यांशी बोलले आहे. कामे वेळेत पूर्ण करा, असे सांगितले आहे. ही वेळ नाशिककरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मी सध्या फिल्डवर आहे,” . शहरातील सर्व विकासकामे प्रगतिपथावर आहेत. गेल्या महिनाभरात मुसळधार पावसामुळे कामांना काहीसा व्यत्यय आला. मात्र, आता पावसाने काहीशी उघडीप दिल्याने भाजपच्याच नव्हे, तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकी दाखवून विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कुणी नकारात्मक विचार किंवा ‘फेक नरेटिव्ह’ पसरवत असेल, तर त्याबाबत मला माहिती नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI