
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, अपघात तसेच लम्पी स्किन डिसीज, घटसर्प आदी साथीच्या आजारांमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुपालक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. या नुकसानीपासून पशुपालकांना संरक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे अवघ्या ४५० रुपयांत दुभत्या गाईला ७० हजार रुपयांचे विमाकवच मिळणार आहे.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ५ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार या योजनेला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. त्यामुळे पशुपालकांच्या जनावरांना विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे. ही माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी दिली.
पशुधनाला विमा संरक्षण देऊन जनावरांचा मृत्यू झाल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून पशुपालकांचे संरक्षण करणे तसेच त्यांना कर्जबाजारीपणापासून वाचविणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.राज्यात या योजनेची अंमलबजावणी नागपूर येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या (MLDB) माध्यमातून करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) या कंपनीची विमाकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. पडिले यांनी दिली.
योजनेत देशी व संकरित दुधाळ गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्या यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त १० पशुधनासाठी विमा संरक्षण घेता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु