
लातूर, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे तसेच शिक्षकांच्या असमान वितरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे जिल्हास्तरीय समायोजन तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तानाजी बिरादार यांनी केली आहे.
यासंदर्भात तानाजी बिरादार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कुमुद लोभे व अरविंद भालके हे उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे तर काही शाळांमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक शिक्षक उपलब्ध असल्याने शिक्षकांच्या वितरणात असमतोल निर्माण झाला आहे. परिणामी शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांमध्ये तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय समायोजनाची प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात यावी. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बिरादार यांनी केली. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी निवेदन स्वीकारून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis