ब्राझीलच्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत यशोधन रावणकोळेची दमदार कामगिरी
एकेरी व दुहेरीत सुवर्ण, तर मिश्र दुहेरीत कांस्यपदक महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्याचा गौरव लातूर, ११ ऑगस्ट (हिं.स.)। ब्राझील येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील धोंडिहीप्परगा येथील खेळाडू कु. यशोधन
यशोधन रावणकोळे


एकेरी व दुहेरीत सुवर्ण, तर मिश्र दुहेरीत कांस्यपदक

महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्याचा गौरव

लातूर, ११ ऑगस्ट (हिं.स.)। ब्राझील येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील धोंडिहीप्परगा येथील खेळाडू कु. यशोधन विजयकुमार रावणकोळे याने उल्लेखनीय कामगिरी करत भारतासह महाराष्ट्र, लातूर, उदगीर आणि धोंडिहीप्परगा गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. यशोधनने पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदक, तर मिश्र दुहेरी गटात कांस्यपदक पटकावले.

ब्राझील येथे झालेल्या या पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशोधनने पुरुष एकेरीच्या सामन्यात ब्राझीलच्या प्रतिस्पर्ध्यावर सरळ सेटमध्ये मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच राजस्थानच्या धीरज सैनी यांच्या साथीने पुरुष दुहेरी गटातही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवले.

मिश्र दुहेरी गटातही यशोधनने दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे लातूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

यशोधन रावणकोळे सध्या भारतीय खेळ प्राधिकरण (SAI), गांधीनगर (गुजरात) येथे प्रशिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यशोधनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र प्रदेशाचे सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री तथा उदगीर-जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे, नगराध्यक्षा सौ. स्वातीताई सचिन हुडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती शिवाजीअण्णा हुडे, माजी आमदार मनोहर पटवारी, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)चे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस कल्याण पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे, माजी सभापती मुन्ना पाटील, चंदरअण्णा वैजापूरे, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी मुळे, सतीश पाटील मानकीकर यांच्यासह विविध मान्यवरांनी यशोधनचे अभिनंदन केले.

0

धोंडिहीप्परगा गावच्या सरपंच सौ. जगदेवी सोमेश्वर पटवारी, चेअरमन लालखा पठाण, प्रा. महेश बापटले धोंडिहीप्परगेकर, पंडित पाटील, गोविंद पाटील, बस्वराज टाकळे, संजय वा. पाटील, पुंडा भाऊजी, श्रीमंतअण्णा बिरादार, अशोक पाटील, शिवशंकर बापटले, सुनील पटवारी, विश्वनाथ कांबळे, केशव गायकवाड, पत्रकार प्रभुदास गायकवाड यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थ आणि तालुक्यातील नागरिकांकडून यशोधनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande