
लातूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। वाढती वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लातूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आता अधिक सक्रिय झाले आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्यामध्ये बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करणारी 'टोईंग व्हॅन' काही दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी महापालिका कार्यालयात झालेल्या या बैठकीस मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, पोलीस उपअधिक्षक सम रिसिंह साळवे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत वाहतूक कोंडीच्या कारणांचा आढावा घेत विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराची वाहतूक अधिक सुरळीत आणि शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने खालील निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. यामध्ये शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करणे. प्रत्येक चौकात 'फ्री लेफ्ट'ची सुविधा तातडीने सुरू करणे. मंगल कार्यालयांसमोरील रस्त्यावर होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या तक्रारींबाबत कठोर कारवाई करणे. जप्त केलेली वाहने रस्त्यावर न ठेवता त्यांची योग्य विल्हेवाट लावणे.
तसेच, दयानंद महाविद्यालय परिसर आणि बार्शी रोडवरील पीव्हीआर चौक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे काढणे. प्रशासनाने या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, गेल्या काही दिवसांत दयानंद महाविद्यालय परिसरातील हातगाडे हटवण्यात आले आहेत. तसेच, पीव्हीआर चौकातील दूध विक्री केंद्राची टपरीही काढून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी मनपाकडून अशा प्रकारे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis