
27 रेल्वेगाड्यांची तपासणी; तिकीटविना प्रवासाची 315, अनियमित प्रवासाची 44 प्रकरणे
नांदेड, ११ ऑगस्ट (हिं.स.) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सक्रिय सहभागातून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवून 565 प्रकरणे उघडकीस आणली. या कारवाईतून रेल्वे प्रशासनाने एकूण ₹3 लाख 24 हजार 320 रुपयांचा महसूल वसूल केला.
विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (DCM), नांदेड बी. रितेश यांच्या देखरेखीखाली ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांनी रेल्वे प्रवासाचे नियम पाळावेत तसेच प्रामाणिक तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा, या उद्देशाने एकूण 27 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली.
या मोहिमेत तिकीट तपासणी पथकांसह तीन रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचाऱ्यांसह एकूण 31 कर्मचारी सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान तिकीटविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांची 315 प्रकरणे आढळली. याशिवाय अनियमित प्रवासाची 44 प्रकरणे, तर अनबुक्ड सामानासंदर्भातील 206 प्रकरणे नोंदविण्यात आली.
या कारवाईतून रेल्वे प्रशासनाने ₹3,24,320 रुपयांची महसूल वसुली केली. तिकीटविना आणि अनियमित प्रवासाला आळा घालणे, रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करणे तसेच प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.
नांदेड विभागाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आणि रेल्वेच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन केल्यास भारतीय रेल्वेची कार्यक्षमता अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis