
अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव
सकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत वाहतुकीवर निर्बंध
अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती वर्दळ आणि त्यातून होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने प्रमुख मार्गांवर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी घालण्याबाबत प्रस्तावित अधिसूचना जारी केली आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे यांनी मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे प्रस्तावित आदेश जारी केले आहेत.
शहरात सन २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत एकूण १,१०८ अपघात झाले आहेत. यामध्ये २१२ प्राणघातक अपघातांत २४६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ९१३ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय प्रस्तावित करण्यात आल्याचे पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रस्तावित आदेशानुसार दररोज सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत हलक्या व जड मालवाहू वाहनांना शहरातील काही प्रमुख मार्गांवर प्रवेश करता येणार नाही.
गौरी इन वा पॉइंट, वेलकम टी पॉइंट, पंचवटी, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गद्रे चौक, नवाथे चौक, बेनाम चौक, अलमास गेट तसेच बडनेरा ते यवतमाळ वाय-पॉइंट या मार्गांचा यात समावेश आहे.
राजुरा नाका, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, इर्विन चौक, दीपक चौक, चित्रा चौक, टांगा पडाव, नागपुरी गेट चौक ते ट्रान्सपोर्ट नगर तसेच भातकुली जकात नाका या मार्गांचाही प्रस्तावित निर्बंधांमध्ये समावेश आहे.
काही मार्गांवर मालवाहू वाहनांसाठी कायमस्वरूपी प्रवेशबंदी प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ आणि गांधी चौक ते अंबापेठ या मार्गांचा समावेश आहे.
तसेच बजरंग टेकडी ते विलासनगर, पटवा चौक, मोरबाग, मसानगंज आणि गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक या मार्गांवरही कायमस्वरूपी निर्बंध प्रस्तावित आहेत. शहरातील परकोटाच्या आतील दाट लोकवस्तीतील सर्व अंतर्गत मार्गांचाही या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे.
शहरातील वाढती वाहतूक, दाट लोकवस्ती आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याच्या या प्रस्तावामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित अधिसूचनेनंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी