
अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : आरोग्य सेवा, स्वच्छता, बांधकाम तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील विविध विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी त्यांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराची पाहणी केली.
आयुक्त डॉ. गोंदावले यांनी सर्वप्रथम मोदी हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी दवाखान्यातील कार्यपद्धती, रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची स्थिती, उपलब्ध औषधसाठा तसेच आवश्यक औषधांची माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयातील उपलब्ध कर्मचारी वर्गाचा आढावा घेत सध्याच्या कामकाजाच्या तुलनेत आणखी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांना वेळेत आणि आवश्यक त्या आरोग्य सुविधा मिळणे महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना समाधानकारक सेवा मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
यानंतर आयुक्तांनी अकोली वळण रस्ता व चमननगर परिसराची पाहणी केली. अकोली वळण रस्ता चमननगर परिसरातून जात असल्याने या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या आणि उपलब्ध सुविधांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वतीने चमननगर येथील नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांचीही त्यांनी पाहणी केली.
या परिसरात नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता कितपत आहे, याची माहिती आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित रस्ते व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन संबंधित कामांना प्राधान्य देत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी