
पतीची अखेरची इच्छा पत्नीने दुःखातही केली पूर्ण
मडावी कुटुंबाच्या निर्णयाला माणुसकीची किनार
यवतमाळ, ११ ऑगस्ट (हिं.स.) : मृत्यूच्या दुःखद प्रसंगालाही माणुसकीची किनार देत सहाय्यक शिक्षक किशोर मडावी यांच्या अवयवांचे दान करण्यात आले. त्यांच्या अवयवांमुळे तीन गरजू रुग्णांना नवजीवनाची संधी मिळाली. काही काळापूर्वी पतीने व्यक्त केलेली अवयवदानाची इच्छा लक्षात ठेवत पत्नी ज्योती मडावी यांनी दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तीन कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
इंझाळा पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या किशोर मडावी यांचा ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता तनिष्क ज्वेलर्सजवळ दुर्दैवी अपघात झाला. दुचाकीने रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. या घटनेने मडावी कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला. मात्र, अशा कठीण प्रसंगीही पत्नी ज्योती यांनी पतीची इच्छा आठवून अवयवदानास संमती दिली.
‘माझ्या जीवाला भविष्यात काही झाले, तर माझे अवयव दान करावेत,’ अशी इच्छा किशोर मडावी यांनी काही काळापूर्वी पत्नीशी बोलताना व्यक्त केली होती. पतीची ही अखेरची इच्छा अश्रूंना आवर घालत ज्योती मडावी यांनी पूर्ण केली.
वैद्यकीय प्रक्रियेनंतर किशोर मडावी यांच्या अवयवांचे दान करण्यात आले. त्यांच्या अवयवांमुळे तीन गरजू रुग्णांना नवजीवनाची संधी मिळाली. एका कुटुंबाने आपला आधार गमावला असला, तरी मडावी कुटुंबाच्या संवेदनशील निर्णयामुळे तीन कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला.
किशोर मडावी हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक होते. अध्यापनाची जबाबदारी पार पाडतानाच ते सामाजिक कार्यातही सक्रिय सहभागी होत. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याने वागणारे शिक्षक अशी त्यांची परिसरात ओळख होती. विविध सामाजिक उपक्रमांत ते पुढाकार घेत असत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयातून समाजासमोर माणुसकीचा आदर्श निर्माण झाला आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी