अंबाजोगाईत ‘शिवाई’पेक्षा ‘लालपरी’ला पसंती; तिकीट दरांवर प्रवाशांची नाराजी
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई आगारात महिनाभरापूर्वी पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा नारा देत दिमाखात दाखल झालेल्या १२ नवीन इलेक्ट्रिक ‘शिवाई’ गाड्यांना प्रवाशांनी चक्क बगल दिली आहे. या वातानुकूलित गाड्यांचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आव
एसटी


बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई आगारात महिनाभरापूर्वी पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा नारा देत दिमाखात दाखल झालेल्या १२ नवीन इलेक्ट्रिक ‘शिवाई’ गाड्यांना प्रवाशांनी चक्क बगल दिली आहे. या वातानुकूलित गाड्यांचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने नागरिक तासन्तास वाट पाहून जुन्याच 'लालपरी'ने प्रवास करणे पसंत करत आहेत. महागड्या प्रवासामुळे एसटी महामंडळाचा हा विद्युत रथ प्रवाशांविनाच धावत असून, या वाढीव दरांमुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाने अंबाजोगाई आगाराला आधुनिक सुविधांनी युक्त अशा बारा इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस गाड्या उपलब्ध करून दिल्या. प्रदूषण कमी होईल आणि प्रवाशांना हायटेक सुविधा मिळतील, या उद्देशाने या गाड्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला कुतूहलापोटी प्रवाशांनी गर्दी केली, मात्र तिकीट दराची तुलना करता प्रवाशांनी आपला मोर्चा पुन्हा साध्या एसटीकडे वळवला. डिझेल गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर दहा ते वीस टक्क्यांनी जास्त आहेत. एकीकडे खाजगी ट्रॅव्हल्सचे दर आणि दुसरीकडे एसटीच्या साध्या गाड्यांचे दर यांच्या स्पर्धेत ही ई-बस तग धरताना दिसत नाही. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पाच-दहा रुपयांचा फरकही मोठा ठरतो. त्यामुळे खिशाला न परवडणाऱ्या या नव्या गाड्या प्रवाशांसाठी केवळ देखावा ठरत आहेत.

इलेक्ट्रिक बसमध्ये आवाज, व्हायब्रेशन कमी असून त्या वातानुकूलित असल्या तरी केवळ गाडी नवीन आहे म्हणून खिशाला कात्री लावणे मध्यमवर्गीयांना परवडणारे नाही. प्रशासनाने तिकीट दर साध्या बससारखे ठेवले तरच या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे. सुविधा देण्याच्या नावाखाली सुरू असलेली ही आर्थिक लूट असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. वंदना समुद्रे या महिला प्रवाशाने आपला अनुभव सांगताना स्पष्ट केले की, त्यांनी माजलगावला ई-बसने प्रवास केला असता त्यांना तब्बल १४८ रुपये तिकीट लागले. महिलांसाठी असलेल्या सवलतीचा विचार करता हे तिकीट अत्यंत महागडे आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या आगाराच्या बारा गाड्या रस्त्यावर धावत आहेत, मात्र अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्याचा थेट फटका आगाराच्या उत्पन्नाला बसण्याची शक्यता आहे. ई-बससाठी चार्जिंग स्टेशन आणि इतर तांत्रिक कामांवर कोट्यवधी रुपयांचा मोठा खर्च झाला आहे. मात्र वाढीव दरामुळे गाड्या रिकाम्या धावत असल्याने महामंडळाची चिंता वाढली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार न करता लादण्यात आलेल्या या तिकीट दरवाढीत कपात न केल्यास या महागड्या गाड्या केवळ 'पांढरा हत्ती' ठरतील अशी रास्त भीती व्यक्त होत आहे. आता यावर वरिष्ठ पातळीवरून काय तातडीचा निर्णय घेतला जातो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande