‘वंदे मातरम्’चा अपमान ठरणार गुन्हा; राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चा जाणीवपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या गायनात अडथळा आणणे आता गुन्हा ठरणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी, 11 ऑगस्ट रोजी ‘वंदे मातरम्
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चा जाणीवपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या गायनात अडथळा आणणे आता गुन्हा ठरणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी, 11 ऑगस्ट रोजी ‘वंदे मातरम् विधेयका’ला मंजुरी दिली. त्यामुळे हे विधेयक आता कायद्यात रूपांतरित झाले आहे.

या कायद्यामुळे ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गान ‘जन गण मन’प्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक ‘वंदे मातरम्’चे गायन रोखले किंवा ते सुरू असताना सभेत अडथळा निर्माण केला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ‘राष्ट्रीय सन्मानाच्या अपमानास प्रतिबंध (दुरुस्ती) अधिनियम, 2026’ लागू झाला आहे. या कायद्याद्वारे ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गान ‘जन गण मन’च्या बरोबरीचे कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.

राज्यसभेने या विधेयकाला 29 जुलै रोजी मंजुरी दिली होती, तर लोकसभेने 30 जुलै रोजी ते मंजूर केले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे या विधेयकाला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.

स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर प्रथमच ‘वंदे मातरम्’

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन केले जाणार आहे.

यापूर्वी ‘राष्ट्रीय सन्मानाच्या अपमानास प्रतिबंध अधिनियम’ अंतर्गत राष्ट्रीय गान ‘जन गण मन’चे गायन जाणीवपूर्वक रोखणे किंवा त्याच्या गायनादरम्यान सभेत अडथळा निर्माण करणे दंडनीय होते. मात्र, राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’साठी अशी स्वतंत्र कायदेशीर तरतूद नव्हती.

राष्ट्रीय गानाचा अपमान केल्यास यापूर्वी तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकत होत्या. दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर पुन्हा दोषी ठरल्यास किमान एक वर्षाच्या कारावासाची तरतूद होती.

‘वंदे मातरम्’साठी विशेष कायदेशीर संरक्षण

विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडताना सरकारकडून सांगण्यात आले होते की, ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असूनही त्याच्या गायनाचा अपमान रोखण्यासाठी सध्या कोणतीही विशिष्ट कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे संबंधित कायद्यात सुधारणा करून राष्ट्रीय गीतालाही त्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार ‘वंदे मातरम्’चे गायन जाणीवपूर्वक रोखणे किंवा त्याच्या गायनादरम्यान अडथळा आणणे दंडनीय करण्यात आले आहे.विधेयकात नमूद केल्यानुसार, संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 24 जानेवारी 1950 रोजी स्पष्ट केले होते की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे गीत आहे. त्याला राष्ट्रीय गान ‘जन गण मन’प्रमाणेच सन्मान आणि दर्जा देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते.

‘वंदे मातरम्’साठी गृह मंत्रालयाचा प्रोटोकॉल

यावर्षीच्या सुरुवातीला केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान एकत्र सादर केले जाणार असल्यास प्रथम ‘वंदे मातरम्’चे सर्व सहा कडवे गायले जावेत, असे निर्देश दिले होते.

28 जानेवारी रोजी गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’च्या गायनासंदर्भातील प्रोटोकॉल जारी केला होता. राष्ट्रपतींचे आगमन, राष्ट्रीय ध्वज फडकावणे आणि राज्यपालांचे भाषण यांसारख्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सहा कडवी सादर केली जातील. या संपूर्ण गायनाचा कालावधी सुमारे 3 मिनिटे 10 सेकंद असेल.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान दोन्ही सादर केले जाणार असल्यास प्रथम ‘वंदे मातरम्’ गायले किंवा वाजवले जाईल. ज्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे गायन होईल, त्या वेळी उपस्थित सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहणे अपेक्षित आहे.

याशिवाय, देशातील सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाने करण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande