पुणे-पिंपरीत सहा हॉटेल, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; ५९८ किलो मावा जप्त
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस
fda


पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच कोंढवा बुद्रुक परिसरात विनापरवाना वाहतूक केला जाणारा ५९८ किलो मीठा मावा जप्त करण्यात आला. या माव्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान विविध हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता आढळून आली. तसेच मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवणे आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.

ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असलेल्या या प्रकारांची अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित आस्थापनांवर कारवाई केली. नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरुद्ध यापुढेही तपासणी व कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातही हॉटेल व खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. तेथील काही हॉटेलांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande