पुणे - ७५ कोटींची रस्ते दुरुस्तीची निविदा रद्द; आयुक्तांचा ठेकेदारांना दणका
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी काढण्यात आलेली ७५ कोटी रुपयांची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निविदेत ठरावीक ठेकेदारांना पात्र ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर होत होते. आयुक्त नवल किशोर राम
Naval Kisahor ram


पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी काढण्यात आलेली ७५ कोटी रुपयांची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निविदेत ठरावीक ठेकेदारांना पात्र ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर होत होते. आयुक्त नवल किशोर राम यांनी निविदेच्या अटी-शर्तींची छाननी केल्यानंतर पुरेशी स्पर्धा होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठेकेदारांच्या कथित एजंटांना मोठा धक्का बसला आहे.

आता शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे प्रत्येकी १० कोटी रुपयांच्या सात स्वतंत्र निविदांद्वारे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक ठेकेदारांना सहभागी होता येऊन निविदा प्रक्रियेत स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

मूळ निविदेतील अटी-शर्तींच्या छाननीदरम्यान अनेक त्रुटी समोर आल्या. त्यानुसार हॉटमिक्स प्लांटची क्षमता किमान १२० टन प्रतितास असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, एका ठेकेदाराचा प्लांट ८० ते १२० टन प्रतितास क्षमतेचा असतानाही त्याला पात्र ठरविण्यात आले होते. इतर ठेकेदारांच्या प्लांटची क्षमता तपासल्यानंतर संबंधित ठेकेदार या निकषात अपात्र ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

तसेच प्रकल्पाच्या जागेवर हॉटमिक्स प्लांट प्रत्यक्ष उभा नसतानाही एका ठेकेदाराला पात्र ठरविण्यात आल्याचे आढळले. या अटी-शर्तीमध्येही त्रुटी असल्याचे छाननीत समोर आले.

दरम्यान, हॉटमिक्स प्लांट भाड्याने घेणाऱ्या ठेकेदारांसाठी नोटरीऐवजी रजिस्ट्रीची सक्ती करण्यात आली होती. या अटीमुळे अनेक ठेकेदार अपात्र ठरले. परिणामी निविदा प्रक्रियेत अपेक्षित प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली नाही.

अटी-शर्तींमुळे निर्माण झालेला संभ्रम, पात्रतेबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि पुरेशी स्पर्धा न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी ७५ कोटींची निविदा रद्द केली. आता सात स्वतंत्र निविदा काढून रस्ते दुरुस्तीची कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande