
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत (एसआयआर) पुणे जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या अर्जांपैकी तब्बल २५ लाख ५ हजार ३८३ अर्ज ‘अनकलेक्टेबल’ ठरले आहेत. मयत, दुबार मतदार, स्थलांतरित, अनुपस्थित तसेच ‘नॉट रेडी टू साईन’ अशा विविध कारणांमुळे हे अर्ज संकलित होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या मतदारांची नावे अंतिम मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार हडपसर, खडकवासला आणि कोथरूड मतदारसंघात अशा अर्जांची संख्या सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदारांपैकी ८७ लाख ९६ हजार ६२४ अर्जांचे, म्हणजेच ९६.८८ टक्के अर्जांचे वितरण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ५९ लाख ५० हजार ४८० अर्जांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून, त्याचे प्रमाण ६५.५३ टक्के आहे. मात्र, २५ लाख ५ हजार ३८३ अर्ज ‘अनकलेक्टेबल’ या वर्गवारीत टाकण्यात आले आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २७.५९ टक्के आहे.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओंना काही मतदारांच्या पत्त्यावर अर्ज वितरित करता आले नाहीत. संबंधित मतदार मयत असणे, एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असणे, कायमस्वरूपी स्थलांतरित होणे, अनुपस्थित राहणे किंवा अर्जावर स्वाक्षरी करण्यास तयार नसणे आदी कारणांमुळे अर्ज ‘अनकलेक्टेबल’ ठरविण्यात आले आहेत. या आकडेवारीमुळे अंतिम मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर नावे कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः हडपसर, खडकवासला आणि कोथरूड मतदारसंघातील ‘अनकलेक्टेबल’ अर्जांची संख्या प्रशासनाच्या दृष्टीने लक्षवेधी ठरली आहे. मात्र, ‘अनकलेक्टेबल’ म्हणून वर्गीकृत झालेला प्रत्येक मतदार अंतिम मतदारयादीतून आपोआप वगळला जाईलच असे नाही. पुनरीक्षण प्रक्रियेतील पुढील पडताळणी आणि अंतिम निर्णयानंतरच कोणाची नावे वगळली जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु