आपलेपणाच्या भावनेतूनच जगातील संघर्ष दूर होऊ शकतात : डॉ. मोहन भागवत
टेकडी गणेश मंदिरातील गर्भगृहाचे लोकार्पण; एकत्व आणि संघटनेचा संदेश नागपूर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : जगात आज निर्माण होणारे बहुतांश संघर्ष, संकटे आणि विघ्ने ही माणसांमधील आपलेपणाची भावना हरवल्यामुळे निर्माण होत आहेत. आपण सर्वजण एकाच ऊर्जेची अभिव्यक्ती आ
सरसंघचालक मोहन भागवत


टेकडी गणेश मंदिरातील गर्भगृहाचे लोकार्पण; एकत्व आणि संघटनेचा संदेश

नागपूर, 11 ऑगस्ट (हिं.स.) : जगात आज निर्माण होणारे बहुतांश संघर्ष, संकटे आणि विघ्ने ही माणसांमधील आपलेपणाची भावना हरवल्यामुळे निर्माण होत आहेत. आपण सर्वजण एकाच ऊर्जेची अभिव्यक्ती आहोत, ही जाणीव मनात ठेवून व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार झाले, तर जगातील अनेक विघ्ने दूर होऊ शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील टेकडी गणेश मंदिराच्या गर्भगृहाचे लोकार्पण मंगळवारी डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

याप्रसंगी एकत्व, आपलेपणा आणि संघटनेचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की,

गणेश हा संघटनेचा देव आणि गणनायक आहे,” असे सांगत डॉ. भागवत म्हणाले की, सर्व भक्तांच्या सहकार्याने टेकडी गणेश मंदिर साकारले आहे. गणेशभक्तांनीही याचप्रमाणे एकत्र येऊन कार्य करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. संघटनेची प्रचंड शक्ती एकवटली की गणेशाचे सुखकर्ता, दुःखहर्ता आणि विघ्नहर्ता हे स्वरूप प्रत्यक्षात येते.

आपल्या अंतर्मनात असलेली चेतना मूलतः एकच आणि सार्वभौमिक आहे. विद्वानांनी तिला वेगवेगळी नावे दिली असली, तरी तिचे मूळ स्वरूप एकच आहे. या जाणीवेतून निर्माण होणारे संघटन हेच खरे संघटन असल्याचे त्यांनी नमूद केले.

जगात स्वार्थ, समान उद्दिष्टे किंवा विविध हितसंबंधांच्या आधारे अनेक संघटना निर्माण होतात. मात्र, आपण सर्वजण एकाच ऊर्जेची अभिव्यक्ती आहोत, ही जाणीव ठेवून इतरांशी व्यवहार करणे म्हणजे खरे एकत्व होय, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

क्रिकेटच्या उदाहरणातून आपलेपणाचा अर्थ

आपलेपणाची भावना स्पष्ट करताना डॉ. भागवत यांनी क्रिकेटचे उदाहरण दिले. क्रिकेट खेळणारे खेळाडू आपल्यासाठी अनोळखी असू शकतात. त्यांच्याशी आपला व्यक्तिगत परिचयही नसतो. तरीही भारतीय संघ जिंकल्यानंतर क्रिकेटची बॅट आयुष्यात कधीही हातात न घेतलेली व्यक्तीदेखील आनंद व्यक्त करते, फटाके फोडते आणि जल्लोष करते. कारण त्या विजयाशी तिचे एक भावनिक नाते निर्माण झालेले असते. तो विजय आपला आहे, अशी भावना तिच्या मनात असते.

हीच आपलेपणाची भावना सातत्याने मनात ठेवून व्यक्तिगत, सामूहिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार झाले, तर जगातील अनेक विघ्ने, संकटे आणि संघर्ष दूर होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशाच्या स्वरूपामागील मूलभूत भावना आणि त्यातील ‘स्पिरिट’चा प्रत्येकाने विचार करावा, असे आवाहनही डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी केले.-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande