यवतमाळ : सुकळी शेतशिवारात झुकलेल्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका; दुरुस्तीची मागणी
यवतमाळ, 11 ऑगस्ट (हिं.स.) | आर्णी तालुक्यातील सुकळी शेतशिवारात नागपूर-तुळजापूर महामार्गालगत असलेले विद्युत रोहित्र एका बाजूला पूर्णपणे झुकले असून, ते धोकादायक अवस्थेत आहे. रोहित्र कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांच्या जी
झुकलेल्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका


यवतमाळ, 11 ऑगस्ट (हिं.स.) | आर्णी तालुक्यातील सुकळी शेतशिवारात नागपूर-तुळजापूर महामार्गालगत असलेले विद्युत रोहित्र एका बाजूला पूर्णपणे झुकले असून, ते धोकादायक अवस्थेत आहे. रोहित्र कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या रोहित्राची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सुकळी येथील किशोर भारती यांच्या शेतातील हे विद्युत रोहित्र सध्या एका बाजूने झुकलेले आहे. रोहित्रासह त्याला जोडलेली विद्युत यंत्रणा आणि वीजवाहक तारा धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. याच परिसरात शेतकरी शेतीची कामे होत असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात शेतशिवारात अनेक शेतकरी काम करीत असतात. अशा परिस्थितीत धोकादायक अवस्थेतील विद्युत रोहित्रामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रोहित्र कोसळल्यास जीवितहानी होण्याबरोबरच शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. रोहित्र धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना दिली आहे. याशिवाय रोहित्राची दुरुस्ती करण्यासाठी निवेदनही देण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने संबंधित ठिकाणी पाहणी करून झुकलेल्या रोहित्राची दुरुस्ती करावी अथवा आवश्यक ती सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी किशोर भारती यांचेसह सुकळी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande