
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव नगरपरिषदेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली असून, प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपावरून बहुजन विकास मोर्चाच्या नगरसेविका उषा अशोक लांडगे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत प्रभागातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नगरसेविका लांडगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत वारंवार संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रभागातील रस्ते दुरुस्ती, नाल्यांची स्वच्छता, कचरा उचलणे, मोकाट जनावरांचा प्रश्न तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, नगरपरिषदेत सत्ताधारी गटाची सत्ता असतानाही एका सत्ताधारी नगरसेविकेलाच आपल्या प्रभागातील कामांसाठी उपोषण करावे लागत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपद एकाच घरात गेल्याने इतर नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यातच नगरसेविका लांडगे यांनी उपनगराध्यक्ष सहल चाऊस यांच्या कारभारावर मनमानीपणाचा आरोप केल्याने पालिकेतील अंतर्गत राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis