
मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। भारतातील सर्वात मोठी फंड हाऊस असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडने ‘एसबीआय बॅलन्स्ड हायब्रिड फंड’ लाँच केला आहे. इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करणारी ही ओपन-एंडेड बॅलन्स्ड स्कीम असून, बाजारातील परिस्थितीनुसार बदलणाऱ्या शिस्तबद्ध ॲसेट ॲलोकेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून दीर्घकालीन भांडवली वाढीसोबत तुलनेने स्थिरता साधण्याचा प्रयत्न या फंडातून केला जाणार आहे. या स्कीममध्ये आर्बिट्राजला परवानगी नाही. या न्यू फंड ऑफरमध्ये १० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत गुंतवणूक करता येणार आहे.
या फंडाचे इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन कॅपिटल ॲप्रिसिएशन आणि उत्पन्न मिळवणे हे आहे. मात्र, या उद्दिष्टाची पूर्तता होईल किंवा विशिष्ट परतावा मिळेल, याची कोणतीही हमी फंडाकडून देण्यात आलेली नाही. फंडाच्या एकूण मालमत्तेपैकी ४० ते ६० टक्के रक्कम इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित इन्स्ट्रुमेंट्समध्ये, तर ४० ते ६० टक्के रक्कम डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवली जाणार आहे. यामध्ये कंपन्यांचे इन्स्ट्रुमेंट्स, आरईआयटीज, सिक्युरिटाइज्ड डेट आणि डेट डेरिव्हेटिव्हज यांचा समावेश असेल.
एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ देबाशीष मिश्रा यांनी सांगितले की, या फंडच्या माध्यमातून इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी संशोधनावर आधारित ॲसेट ॲलोकेशन आणि प्रुडंट रिस्क मॅनेजमेंटचा शिस्तबद्ध दृष्टिकोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एसईबीआयच्या नियमांनुसार या स्कीमला परदेशी सिक्युरिटीजमध्येही गुंतवणूक करता येणार असून, त्याचे प्रमाण नेट ॲसेट्सच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही. एनएफओदरम्यान किमान गुंतवणूक रक्कम ५ हजार रुपये आहे. त्यानंतर १ रुपया आणि त्याच्या पटीत अतिरिक्त गुंतवणूक करता येईल. अतिरिक्त खरेदीसाठी किमान १ हजार रुपये गुंतवावे लागतील.
या फंडचा बेंचमार्क ‘निफ्टी ५० हायब्रिड कॉम्पोझिट डेट ५०:५० इंडेक्स’ आहे. अलॉटमेंटच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत निर्धारित मर्यादेपर्यंत म्हणजेच १० टक्के युनिट्स रिडीम किंवा स्विच आऊट केल्यास एक्झिट लोड आकारला जाणार नाही. मात्र, या मर्यादेपेक्षा अधिक युनिट्स रिडीम केल्यास लागू एनएव्हीच्या १ टक्के एक्झिट लोड आकारला जाईल. एक वर्षानंतर रिडीम किंवा स्विच आऊट केल्यास एक्झिट लोड शून्य असेल.
फंडच्या डेट पोर्शनचे व्यवस्थापन राजीव राधाकृष्णन, तर इक्विटी पोर्शनचे व्यवस्थापन तन्मय देसाई करणार आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटचा अभ्यास करून आपल्या गुंतवणूक व करसल्लागारांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule