
रत्नागिरी, 11 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटातील ओझरे खिंडीजवळ रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा बनला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आंबा घाट मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बसेस पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एसटीला दिला आहे. पर्यायी वाहतूक अणुस्कुरा घाटातून वळविण्यात आली आहे.
सतत पडणारा पाऊस, रस्त्याला पडलेल्या मोठ्या भेगा त्यामुळे अरुंद झालेला रस्ता आंबा घाटातील रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे आंबा घाटाऐवजी लांजा - वाटुळ - ओणी - पाचल - अणुस्कुरा - मलकापूर - कोल्हापूर या मार्गे एसटी बसेस नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा अधिक खर्च होणार असून प्रवासाचे अंतर ४२ कि.मी.ने वाढणार आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात वाढ होणार आहे. याबाबतच्या आदेशाची प्रत जिल्ह्यातील सर्व स्थानकप्रमुखांना देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी