ससूनच्या अतिदक्षता विभागात अपुऱ्या खाटांमुळे रोज ५-६ गंभीर रुग्ण प्रतीक्षेत
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील गंभीर रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय जीवनदायिनी ठरत असले, तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय प्रशासनावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. ससूनमधील अतिदक्षता विभागातील (ICU)
sasoon


पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील गंभीर रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय जीवनदायिनी ठरत असले, तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय प्रशासनावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. ससूनमधील अतिदक्षता विभागातील (ICU) खाटा अपुऱ्या पडत असून दररोज पाच ते सहा गंभीर रुग्ण खाटेच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध खाटांची संख्या यांचे गणित जुळत नसल्याने अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला प्रशासन, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे ससूनमधील सूत्रांनी सांगितले.पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर शासकीय रुग्णालये आणि दवाखाने उपलब्ध असतानाही किरकोळ उपचारांसाठी अनेक रुग्ण ससूनमध्ये पाठविले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे आधीच रुग्णसंख्येचा भार असलेल्या ससून रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत आहे.याशिवाय जिल्हा रुग्णालय, पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कमला नेहरू रुग्णालय तसेच पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी ससूनमध्ये पाठविले जाते. या रुग्णांचा ओघ सातत्याने सुरू असल्याने ससूनच्या अतिदक्षता विभागातील उपलब्ध खाटा अपुऱ्या पडत आहेत. परिणामी गंभीर रुग्णांना उपचारासाठी खाट उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. गंभीर रुग्णांसाठी ससून हे प्रमुख संदर्भ रुग्णालय असल्याने त्यावरील वाढता भार कमी करण्यासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयांमधील अतिदक्षता सुविधा सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande