शंकेश ज्वेलर्सचा आयपीओ १८ ऑगस्टपासून होणार खुला
मुंबई , 11 ऑगस्ट (हिं.स.)। शंकेश ज्वेलर्स लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री अर्थात आयपीओसाठी ८८ ते ९३ रुपये प्रति इक्विटी शेअर असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा आयपीओ मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार असून गुरुवार, २० ऑगस्ट रोजी बंद होईल.
Shankesh Jewellers IPO to Open on August 18


मुंबई , 11 ऑगस्ट (हिं.स.)। शंकेश ज्वेलर्स लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री अर्थात आयपीओसाठी ८८ ते ९३ रुपये प्रति इक्विटी शेअर असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा आयपीओ मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार असून गुरुवार, २० ऑगस्ट रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख सोमवार, १७ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येकी पाच रुपये दर्शनी मूल्याच्या किमान १६० इक्विटी शेअर्ससाठी अर्ज करता येणार असून त्यानंतर १६० शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

या आयपीओमध्ये २,७४२ दशलक्ष रुपयांपर्यंत रकमेचे २ कोटी ९४ लाख ८२ हजार इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू, तसेच ९३० दशलक्ष रुपयांपर्यंत रकमेच्या एक कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ऑफर फॉर सेलअंतर्गत प्रवर्तक विक्री समभागधारक कांतिलाल खीमराज जैन यांच्याकडून ४८ लाख आणि मनोज कांतिलाल जैन यांच्याकडून ५२ लाख इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

मुंबईत मुख्यालय असलेली शंकेश ज्वेलर्स ही व्यवसाय ते व्यवसाय अर्थात बीटूबी पद्धतीने कार्यरत असलेली दागिने कंपनी आहे. कंपनी हाताने तयार केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची निर्मिती आणि ग्राहकांच्या गरजेनुसार दागिन्यांचे कस्टमायझेशन करते. डिझाइनपासून इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि तयार दागिन्यांचे ग्राहकांपर्यंत वितरण या प्रक्रियेत कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते. हाताने तयार केलेल्या दागिन्यांच्या क्षेत्रात कंपनीला तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

कंपनीचा देशभरात विस्तारलेला बीटूबी ग्राहकवर्ग असून त्यात जॉयलुक्कास, पी. एन. गाडगीळ अँड सन्स, कल्याण ज्वेलर्स, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स, मनोज वैभव जेम्स ‘एन’ ज्वेलर्स, नोव्हेल ज्वेल्स आणि इतर आघाडीच्या दागिने कंपन्यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने ४१८ ग्राहकांना सेवा दिली असून कामकाजातून मिळणारा महसूल १६,३०७ दशलक्ष रुपये राहिला. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये महसूल १४,०३८ दशलक्ष रुपये, तर २०२४ मध्ये १०,६१७ दशलक्ष रुपये होता. कंपनीने गेल्या काही वर्षांत महसूल आणि नफ्यात सातत्याने वाढ नोंदवली आहे.

हा आयपीओ बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे आणला जात असून, ऑफरमधील किमान ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी किमान १५ टक्के, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के हिस्सा राखीव असेल. प्रमुख गुंतवणूकदार वगळता अन्य गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे अर्ज करावा लागणार असून, यूपीआयच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना यूपीआय आयडीचा तपशील द्यावा लागेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande