



रत्नागिरी, 11 ऑगस्ट (हिं.स.) । येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे हे सलग पंधरावे वर्ष आहे.
हा सप्ताह १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या काळात साजरा होणार आहे. उद्घाटनाचे कीर्तन रत्नागिरीत झाल्यानंतर १७ ऑगस्टपासून पुढचे सात दिवस दापोली परिसरातील विविध सात गावांमध्ये हा कीर्तन सप्ताह त्या त्या ठिकाणच्या देवस्थान मंडळांच्या सहकार्याने साजरा होणार आहे.
पहिल्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळात रत्नागिरीतील ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहातील भगवान परशुराम सभागृहात वरवडे (कणकवली) येथील कीर्तनकार हभप महेंद्रबुवा अनंत पंतमिराशी कीर्तन सादर करतील. या कीर्तनाला ऑर्गनची साथ निरंजन गोडबोले व तबला साथ उदयोन्मुख युवा वादक वेदांत कोकजे हाकरणार आहे.
दापोली परिसरातील गावांमध्ये रोज रात्री १० ते १२ या वेळात होणार असलेल्या कीर्तनांचे वेळापत्रक असे - १७ ऑगस्ट श्री सप्तेश्वर देवस्थान, पंचनदी, १८ ऑगस्ट - श्री एकनाथ देवस्थान, हर्णै, १९ ऑगस्ट - श्री पूर्वाभिमुख लक्ष्मीनारायण मंदिर, मुरूड. या तिन्ही ठिकाणी पुण्याचे युवा कीर्तनकार मंदार गोखले कीर्तने सादर करतील. २० ऑगस्ट रोजी श्री राम मंदिर, आडे, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळात श्री दुर्गा देवी मंदिर, आंजर्ले या दोन ठिकाणी पुण्याचे प्रसिद्ध युवा कीर्तनकार ज्ञानेश धानोरकर-जोशी कीर्तन सादर करतील.
त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी रात्री १० ते १२ या वेळात श्री. गणपती मंदिर, आसूद, तर २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी पादुका मंदिर, जालगाव येथे भिवंडीचे कीर्तनकार हभप अभय घांग्रेकर कीर्तने सादर करतील. या कीर्तनाने सप्ताहाची अखेर होईल.
या कीर्तनांना दापोलीतील अनुराग बाळ व वरद दातार ऑर्गनची साथ, तर तबल्याची साथ सोहम जोशी, महेश मेहेंदळे, देवीदास दातार व प्रथमेश फाटक करणार आहेत.
कीर्तन सप्ताहातील कीर्तनांना उपस्थित राहून कीर्तनांचा आस्वाद कीर्तनप्रेमी श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी