
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)।अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात ‘ड्रग फ्री कॅम्पस’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नियोजन भवन येथे शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला शहरातील सुमारे ४०० मुख्याध्यापक उपस्थित होते.
महाराष्ट्र अंमली पदार्थमुक्त अभियान आणि शून्य सहनशीलता धोरणांतर्गत ‘ड्रग फ्री कॅम्पस’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. शाळा-महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री, साठवणूक आणि प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात अंमली पदार्थविरोधी जनजागृती, प्रत्येक शैक्षणिक संस्थेत अंमली पदार्थ प्रतिबंधक समितीची स्थापना, सतर्कता बाळगणे, व्यसनाधीन विद्यार्थ्यांकडे कलंकाच्या भावनेने नव्हे तर संवेदनशीलतेने पाहणे, स्वयंसेवक विद्यार्थी तयार करणे आणि पोलिसांशी समन्वय साधणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढू नये यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला मुक्तांगण डेडिकेशनच्या उपसंचालिका सोनाली काळे, सारथी यूथ फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे, डॉ. संतोष कोटी, विद्यानंद स्वामी, पोलिस उपायुक्त वृष्टी जैन, प्रीतम यावलकर, डॉ. आश्विनी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आश्विनी पाटील यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड